गाडीचे व्हिडीओ शूटिंग केल्याच्या संशयावरून चालकाला बेदम मारहाण,५ जणांवर गुन्हा दाखल
मंडणगड :- गाडीचे व्हिडीओ शूटिंग केल्याच्या संशयावरून चुलत भावाने आणि त्याच्या कुटुंबाने एका ४७ वर्षीय चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना मंडणगड तालुक्यातील शिपोळे बंदर येथे घडली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,याबाबत जमान सईद लांबे यांनी फिर्याद दिली आहे. ते गुरुवार, २ एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. ते चुलत भाऊ रशीद शरीफ लांबे यांच्या घरासमोर पोहोचले असता, नवाफ रशीद लांबे याने त्यांची गाडी अडवली. ‘तू माझ्या गाडीचे व्हिडीओ शूटिंग केले आहेस, तुझा मोबाईल दाखव,’ असे म्हणत नवाफने वादाला सुरुवात केली.
जमान लांबे यांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने नवाफने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्याने आपले वडील रशीद आणि भाऊ सैफ यांना बोलावून घेतले. या मारहाणीत रशीद लांबे यांच्या जेसीबी ऑपरेटरनेही फिर्यादीला मारहाण केली. तसेच रेश्मा लांबे यांनी फिर्यादीचा शर्ट ओढून शिवीगाळ केली. या सर्व राड्यामध्ये आणि ओढाताणीमध्ये फिर्यादीच्या खिशातील ११,३०० रुपये रोख आणि सोन्याचे मंगळसूत्र कुठेतरी पडून गहाळ झाले
या झटापटीत रशीद लांबे याने जमान सईद याचा डावा पाय दुचाकीच्या गरम सायलेन्सरला टेकवला, ज्यामुळे त्यांच्या पोटरीला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, त्याचा मोबाईल हिसकावून तो रस्त्यावर आपटून फोडून टाकला.
मंडणगड पोलिसांनी याप्रकरणी रशीद शरीफ लांबे, सैफ रशीद लांबे, रेश्मा रशीद लांबे, नवाफ रशीद लांबे, रशीद लांबे यांचा जेसीबी ऑपरेटर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास मंडणगड पोलिस करत आहेत.