लांजात उघड्यावर ज्वालाग्राही पदार्थांचा वापर
दुकानदारावर लांजा पोलिसांची कारवाई
लांजा:
मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा बाजारपेठेत सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला ज्वालाग्राही पदार्थांचा (गॅस सिलेंडर आणि शेगडी) धोकादायक वापर करून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी एका व्यावसायिकावर लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक ३ एप्रिल रोजी पहाटे ३:२० वाजेच्या सुमारास लांजा बाजारपेठेतील केदारलिंग मेडिकल आणि श्री समर्थ किराणा स्टोअर्सच्या मधल्या मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. आरोपी रविंद्र प्रकाश दळवी (वय ५३ वर्षे, रा. कनावजेवाडी, लांजा) हे सार्वजनिक रस्त्याच्या कडेला गॅस सिलेंडर आणि शेगडीच्या साहाय्याने उघड्यावर खाद्यपदार्थ बनवून विक्री करत होते.
या ठिकाणी ज्वालाग्राही पदार्थांच्या हयगयीमुळे आग लागण्याची शक्यता होती, तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होईल अशा स्थितीत हा व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राजेश शांताराम शिंदे यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.