दापोलीत घराच्या पायाभरणीवेळी राडा
जागेच्या वादातून परस्परविरोधी गुन्हे दाखल
दापोली:
तालुक्यातील वणौशी तर्फे नात देवळवाडी येथे घराच्या बांधकामावरून दोन कुटुंबांत जोरदार हाणामारी झाली आहे. एका गटाने मारहाणीची तक्रार दिल्यानंतर, आता दुसऱ्या गटानेही फिर्याद दिली असून दापोली पोलिसांनी दोन महिलांसह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश दत्ताराम चव्हाण (वय ५०, सध्या रा. विरार, मूळ रा. वणौशी) हे आपल्या मूळ गावी नवीन घराच्या बांधकामाचा मुहूर्त करण्यासाठी पूजा करत होते. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही पूजा सुरू असताना, संशयित आरोपी राजकुमार पाटणे आणि जोत्स्ना पाटणे तिथे आले. “ही आमची जागा आहे, येथे घर बांधायचे नाही,” असे म्हणत त्यांनी वादाला सुरुवात केली.
दगडाने मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी राजकुमार पाटणे यांनी फिर्यादी अंकुश चव्हाण यांच्या अंगावर धावून जात जमिनीवर पडलेला दगड उचलून त्यांच्या उजव्या हाताच्या पंजावर मारला. यावेळी अंकुश यांचा भाऊ दिनेश हा त्यांना सोडवण्यासाठी आला असता, आरोपी जोत्स्ना पाटणे यांनी त्यांच्या पाठीत दगड मारून दुखापत केली. तसेच फिर्यादींच्या वृद्ध आईला धक्काबुक्की व शिवीगाळ करत “तुम्हाला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देण्यात आली.
अंकुश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी राजकुमार बाळाजी पाटणे (वय ६५) आणि जोत्स्ना पाटणे (वय ५०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १३१, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.