परशुराम घाटात कार अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
चिपळूण– मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात शुक्रवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर चिपळूण येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात झाल्यानंतर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. मदतकार्यासाठी स्थानिकांचे अनेकांचे हात पुढे आले. त्यामुळे जखणींना उपचारासाठी वेळेत चिपळूणपर्यंत नेता आले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक संजय भंडारी (वय – 28, रा. कांची, ता. नाशिक) हा आपल्या मित्रांसह कारने (एमएच 15 जेएच 0516) गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी जात होता. परशुराम घाट परिसरात आल्यानंतर चालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवली आणि त्याचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे कार रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाली. या भीषण अपघातात रोहित संतोष भालेकर (वय – 28, रा. इंदिरानगर, नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा संपत आव्हाड (वय – 33, रा. चापडगाव, ता. निफाड), संदीप चंद्रभान डेरिंगे (वय – 36, रा. पळसे, नाशिक) आणि कार चालक प्रतीक भंडारी हे जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रतीक भंडारी, कृष्णा आव्हाड, संदिप डेरिंगे यांच्यावर चिपळूणातील खासगी रूग्णालयात आज सकाळपर्यंत उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांचे नातेवाईक चिपळूणमध्ये दाखल झाले आणि जखमींना ताब्यात घेवून गावी निघून गेले. रोहित भालेकर याचा मृतदेह कामथे उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. त्यांचे नातेवाईक चिपळूणात दाखल झाले आहेत. शवविच्छेदन आणि पोलिसांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र चिपळूणचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक ईरशाद बेग आणि त्यांचे सहकारी काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रूग्णवाहिका बोलवली. त्यानंतर जखमीना तत्काळ चिपळूणमधील खासगी रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. हा अपघात रहदारीच्या ठिकाणी झाला त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासीही आपली वाहने थांबून मदतकार्यात गुंतले होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परशुराम, वालोपे, फरशी आणि चिपळूण भागातील नागरिकांनी परशुराम घाटात धाव घेतली होती.