ठेकेदारांची साडेतीनशे कोटींची बिले रखडली
चिपळूण विभागातील शेकडो ठेकेदार मेटाकुटीस
चिपळूण : शहरासह खेड , दापोली, मंडणगड, गुहागर या पाच तालुक्यांतील सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची अंदाजे साडेतीनशे कोटी रुपयांची बिले अडकली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या पाच तालुक्यातील शेकडो ठेकेदार अक्षरशः मेटाकुटीस आले असून वेळीच बिले मिळाली नाहीत तर सर्व ठेकेदार मिळून मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत शहरासह उत्तर रत्नागिरी मधील पाच तालुके येतात. उत्तर रत्नागिरीत कोट्यवधींची विकासकामे झाली आहेत तर काही सुरू आहेत.झालेल्या कामांची बिले ३१ मार्चपूर्वी मिळणे अपेक्षित होते. मात्र निधी आला नसल्याने मार्च अखेरीस ठेकेदारांची बिले काढता आली नाहीत. त्यामुळे मार्च एंडिंगला शंभराहून अधिक ठेकेदारांनी चिपळूण विभागीय कार्यालयात धाव घेतली होती. त्यामध्ये चिपळूण मधील ठेकेदारांची जवळपास दीडशे कोटींची बिले प्रलंबित आहेत. निधीची कमतरता पडणार नाही असे राज्य सरकारचे मंत्री वारंवार सांगतात मात्र झालेल्या कामांची बिले का देत नाही? असा सवाल ठेकेदार विचारीत आहेत.
११ कोटींची बिले ठेकेदारांना अदा
यासंदर्भात कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी माहिती सांगितले की, ११ कोटींचा निधी आला. त्यानुसार रेशो ठरवून ठेकेदारांना ३१ मार्च रोजी रात्री काही प्रमाणात बिलांचे वाटप करण्यात आले. निधी परत गेला वैगरे या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही.सर्व ठेकेदारांना आलेल्या निधी प्रमाणे न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, ठेकेदारांना समाधानकारक बिले न मिळाल्याने संतप्त झाले आहेत.