रत्नागिरीत थिबा पॅलेस परिसरात बिबट्याचा वावर; सीसीटीव्हीमध्ये थरार कैद!
रत्नागिरी | प्रतिनिधी
रत्नागिरी शहराचे ऐतिहासिक आकर्षण असलेल्या थिबा पॅलेस परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दि. ४ एप्रिल रोजी रात्री १० च्या सुमारास स्थानिक रहिवासी रुपेश रघुनाथ सावंत यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये बिबट्या स्पष्टपणे दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या परिसरातील रहिवासी रुपेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून या भागात बिबट्याचा संचार असल्याचा संशय स्थानिक व्यक्त करत होते. पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले आणि रात्रीच्या वेळी ऐकू येणारे आवाज यामुळे परिसरात दहशत होती. मात्र, बिबट्या नेमका कोठे आणि कधी येतो, याचे ठोस पुरावे मिळत नव्हते.
या पार्श्वभूमीवर, सावंत यांनी सुरक्षेच्या कारणास्तव तीन दिवसांपूर्वीच आपल्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. शनिवारी रात्री १० च्या सुमारास बिबट्या त्यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये शिरला आणि ही संपूर्ण हालचाल कॅमेऱ्यात कैद झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या शांततेत बिबट्या सावजाच्या शोधात सावंत यांच्या आवारात शिरला होता. काही वेळ परिसरात वावरल्यानंतर तो पुन्हा अंधारात गायब झाला. आज सकाळी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तेव्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने सावंत कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक चक्रावून गेले.
थिबा पॅलेस हा परिसर पर्यटकांच्या वर्दळीचा आणि दाट लोकवस्तीचा भाग आहे. बिबट्याचा वावर आता सीसीटीव्हीमुळे सिद्ध झाल्याने वनविभागाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
“आम्हाला गेल्या अनेक दिवसांपासून भीती वाटत होती, म्हणून आम्ही सीसीटीव्ही लावले. काल रात्री १० वाजता बिबट्या प्रत्यक्ष आवारात दिसल्याने आता घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा.”
— रुपेश रघुनाथ सावंत (स्थानिक रहिवासी)