सामाईक बोअरिंगच्या कारणावरून भावंडांमध्ये लोखंडी पाईपने मारहाण
चिपळूण:
सामाईक बोअरिंगचे पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावाने आपल्या मुला-बाळांच्या मदतीने भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील खेर्डी बौद्धवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविंद्र भिकाजी मोहिते (५५) हे १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या सामाईक बोअरिंगचे पाणी भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचे भाऊ आरोपी दिलीप भिकाजी मोहिते यांनी त्यांना अडवले. “तू पाणी भरायचे नाही, तुझा बोअरिंगशी काही संबंध नाही, हे बोअरिंग माझ्या हिश्शात आहे,” असे म्हणून त्यांनी पाणी भरण्यास सक्त मनाई केली.
पाणी भरण्यावरून सुरू झालेल्या या शाब्दिक वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. रागाच्या भरात आरोपी दिलीप मोहिते यांनी हातातील लोखंडी पाईपने फिर्यादी रविंद्र मोहिते यांच्या डोक्यात गंभीर प्रहार केला. यावेळी आरोपीचा मुलगा वैभव दिलीप मोहिते आणि पत्नी दिपाली दिलीप मोहिते यांनी फिर्यादीला दोन्ही हातांनी धरून ठेवले, धक्काबुक्की केली आणि अश्लील शिवीगाळ केली.
या हल्ल्यात रविंद्र मोहिते हे जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी २ एप्रिल रोजी पहाटे २ वाजता भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ११५(२), ३(५) या कलमान्व्ये गुन्हा दाखल केला आहे.