तृतीयपंथी म्हणून भासवणाऱ्या तिघांना पकडले
चिपळूण:
तृतीयपंथीय असल्याचा वेश परिधान करून गावामध्ये भीक मागण्यासाठी फिरणाऱ्या तीन पुरुषांना येथील तरुणांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मार्गताम्हाने येथे घडलेल्या या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे तिघेही चिपळूण खिंडी येथे वास्तव्यास असून मूळ बुलढाण्याचे असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
गेले काही दिवस तीन अज्ञात पुरुष तृतीयपंथीय असल्याचा वेश परिधान करून गावोगावी भीक मागत फिरत असल्याचे तरुणांना आढळून आले होते. गुरुवारी मार्गताम्हाने बाजारपेठेत गावातील अविनाश चव्हाण, प्रसाद साळवी, अलंकार चव्हाण, विघ्नेश चव्हाण यांच्यासह काही तरुणांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. ते एका बिअर बारमध्ये दारू पितानाही आढळून आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली. ओळखपत्र विचारण्यात आले.
मात्र त्यांच्याकडून सुरुवातीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांना तरुणांनी धारेवर धरल्याने खरा प्रकार सांगून टाकला. संशय बळावल्याने तरुणांनी सर्व ग्रामस्थांना बोलावले. पोलीस पाटील पंकज चव्हाण यांनी पोलिसांना संपर्क केल्यानंतर चिपळूण पोलीस ठाण्यात त्यांना हजर करण्यात आले.