राष्ट्रीय तायक्वॉंदो पंच परीक्षेत एस.आर.के. क्लबचे वर्चस्व
प्रशिक्षक शाहरुख शेख यांना मानाचा ‘कुक्किवान अवॉर्ड’; जिल्ह्यातील ९ पंच उत्तीर्ण
रत्नागिरी : तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडिया आणि तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने रत्नागिरीत पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वॉंदो पंच व रिफ्रेशर परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या ‘एस.आर.के. तायक्वॉंदो क्लब’च्या पंचांनी घवघवीत यश संपादन केले आहे. क्लबचे प्रमुख प्रशिक्षक शाहरुख निसार शेख यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘बेस्ट सेमिनार रेफ्री’ म्हणून अत्यंत प्रतिष्ठेच्या कुक्किवान अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ३० व ३१ मार्च २०२६ रोजी ही परीक्षा पार पडली. अखिल भारतीय स्तरावर आयोजित या परीक्षेत देशभरातून सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. खेळाडूंचे तांत्रिक कौशल्य आणि शारीरिक क्षमता यांची अत्यंत कडक चाचणी या वेळी घेण्यात आली.
यशस्वी पंचांची नावे
एस.आर.के. तायक्वॉंदो क्लबचे शाहरुख निसार शेख (बेस्ट सेमिनार रेफ्री), मिलिंद अशोक भागवत, सुजल रंजीत सोळंके, साहिल शैलेश आंबरेकर, अमेय अमोल सावंत, वेदांत सुरज चव्हाण, श्रुती रामचंद्र चव्हाण, समर्था सतीश बने, ओम पांडुरंग अप्राज हे ९ पंच या राष्ट्रीय परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत:
उत्तीर्ण झालेल्या या सर्व पंचांना आता जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
मान्यवरांच्या हस्ते गौरव
शाहरुख शेख यांना सेमिनारचे एक्झामिनर श्री. सुभाष पाटील आणि वेंकटेश्वरराव कररा यांच्या हस्ते कुक्किवान अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, जिल्हा सचिव लक्ष्मण करा यांसह मान्यवरांनी खेळाडूंचे कौतुक केले.
तसेच, एस.आर.के. क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य प्रफुल्ल हातिसकर व निखिल सावंत यांनी पंचांच्या तयारीवर समाधान व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.