मुंबईतील हत्येचा चिपळूणमध्ये उलगडा; मानवी हाडांमुळे गुन्ह्याचा पर्दाफाश
चिपळूण:- तालुक्यातील रामपूर येथे सापडलेल्या मानवी हाडांमुळे मुंबईतील मालाड येथे झालेल्या एका भीषण हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. आर्थिक व्यवहारातून झालेल्या या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली असून, त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एजाज कुरेशी (५४, रा. मालाड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी विशाल खोडदेकर (रामपूर, चिपळूण) आणि त्याची प्रेयसी जन्नतुनीसा खान (मालाड) यांना अटक करण्यात आली आहे. सदनिकेच्या ४ लाख रुपयांच्या अनामत रकमेवरून झालेल्या वादातून १५ नोव्हेंबर २०२५ रोजी मालाड येथे कुरेशी यांची हत्या करण्यात आली.
हत्येनंतर मृतदेह कारने रामपूर येथे आणून पुरण्यात आला. दोन महिन्यांनी प्राण्यांनी मृतदेह बाहेर काढल्याचे लक्षात येताच, पुरावा नष्ट करण्यासाठी संशयितांनी तो डिझेल ओतून जाळला.
घटनास्थळी मानवी हाडांसोबत एक स्टील रॉड सापडला. कुरेशी यांच्या पायाचे ऑपरेशन झाले होते, या माहितीच्या आधारे मृतदेहाची ओळख पटली. संशयित विशाल खोडदेकर चार महिने पसार होता, मात्र फेसबुकवरील हालचालींमुळे पोलिसांनी त्याचा मागोवा घेत मालाडमधून त्याला ताब्यात घेतले.