एसटी बसमधून डिझेल चोरणारा अटकेत
आरोपीकडे आढळली विनापरवाना बंदूक
दापोली:
दापोली तालुक्यातील भडवळे येथे मुक्कामी असलेल्या एसटी बसमधून डिझेल चोरणाऱ्या एका चोरट्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी आरोपीच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एक गावठी बनावटीची बंदूक आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० मार्च रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास भडवळे शेरी भोईवाडी बस स्टॉप येथे एसटी बस (क्र. MH 20 BL 1535) मुक्कामी होती. यावेळी आरोपी गौतम मनोहर रुखे (वय ३६, रा. दयाळ रुखेवाडी, खेड) हा आपल्या वॅगनर गाडीतून (क्र. MH 01 DR 3451) तिथे आला. त्याने एसटी बसच्या डिझेल टँकचे झाकण उघडून पाईपच्या साहाय्याने कॅनमध्ये डिझेल काढण्यास सुरुवात केली. यावेळी बसचे वाहक निवृत्ती सखाराम पवार (वय ३९) यांनी हा प्रकार पाहिला आणि पोलिसांना पाचारण केले.
चोरीच्या उद्देशाने आलेल्या आरोपीची वॅगनर गाडी पोलिसांनी तपासली असता, त्यात बेकायदेशीररीत्या बाळगलेली १२ बोअरची सिंगल नळी असलेली गावठी बनावटीची बंदूक आणि १२ बोअरचे एक जिवंत काडतूस पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी तात्काळ शस्त्र आणि वाहन जप्त केले आहे.
या प्रकरणी एसटी वाहक निवृत्ती पवार यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी गौतम रुखे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०५ (बी) (इ) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम २५ (१-ख) (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीकडे बंदूक कोठून आली, याचा शोध घेतला जात आहे.