संगमेश्वर तालुक्यातून पाच जण बेपत्ता
माहिती असल्यास कळवण्याचे संगमेश्वर पोलिसांचे आवाहन
संगमेश्वर: संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या घटनांमध्ये महिला, वृद्ध आणि तरुणांसह पाच जण बेपत्ता झाले असून, त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या सर्व प्रकरणांत नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात ‘नापत्ता’ असल्याची नोंद करण्यात आली असून पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना शेबवणे जुवळेवाडी येथील असून, ८० वर्षीय वृद्ध महिला श्रीमती इंदिरा दाजी जुवळे या २८ एप्रिल २०२४ पासून बेपत्ता आहेत. त्या घराबाहेर फिरत असताना कोणासही काहीही न सांगता निघून गेल्या.
दुसरी घटना चिखली पंडववाडी येथील असून १८ वर्षीय तरुणी शिवानी सीताराम म्हादे ही शिवणकाम क्लासला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली, ती अद्याप घरी परतलेली नाही. याचप्रमाणे चिखली धनावडेवाडी येथील २२ वर्षीय युवक अक्षय चंद्रकांत होडे हा कामासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेला होता, मात्र त्याचाही संपर्क होऊ शकलेला नाही.
चौथ्या घटनेत गोळवली कोंडकरडेवाडी येथील ६० वर्षीय वृद्ध नारायण गुणाजी बाचीम हे घराच्या ओट्यावर झोपलेले असताना मध्यरात्री अचानक बेपत्ता झाले.
पाचव्या प्रकरणात राजिवली बौद्धवाडी येथील २२ वर्षीय प्रणाली प्रकाश कदम ही तरुणी घरातून वाडीत जाते असे सांगून गेली होती, ती अद्याप सापडलेली नाही.
या सर्व व्यक्तींच्या वर्णनावरून आणि मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तपासचक्रे फिरवली आहेत. या बेपत्ता व्यक्तींबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने तपासिक अंमलदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. एस. जाधव (बक्कल नंबर ५८) यांच्याशी ९०११३३९१४७ या मोबाईल क्रमांकावर किंवा संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या ०२३५४-२७२०३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संगमेश्वर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.