कोयनेतील पाणीसाठा आता ३१ ऑगस्टपर्यंत राखीव
चिपळूण : वीजनिर्मितीसाठी ४० टीएमसीचा कोटा निश्चित
रत्नागिरी: यावर्षी अलनिनोचा परिणाम जाणवणार असल्याने पाऊस उशिरा येण्याची व कमी प्रमाणात होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वच धरणांतील पाणी राखीव ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. कोयना प्रकल्प व्यवस्थापनाने पाणी वापराचा आराखडा तयार केला आहे. वीजनिर्मितीसाठी प्रकल्पात ४० टीएमसी पाणी राखीव ठेवले आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मॉन्सून अनिश्चित व कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने पाण्याच्या काटकसरीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य शासनाने पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी राखीव ठेवण्याच्या सूचना धरणांच्या प्रमुखांना केल्या आहेत.
यावर्षी प्रथमच धरणांतील साठा जूनऐवजी थेट ३१ ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोयना धरणात ६३.७३ टीएमसी साठा आहे. वीजनिर्मितीसाठी प्रकल्पात ४० टीएमसी पाणी राखीव ठेवले आहे. ऑगस्टपर्यंत पाणी उपलब्धतेसाठी पाच टीएमसी पाणी धरणात राखीव ठेवले जाणार असल्याचे कोयना धरण विभागाने स्पष्ट केले आहे. कोयना धरणातील सर्वाधिक पाणी हे वीजनिर्मितीसाठी राखीव ठेवावे लागणार आहे. पाऊस उशिरा आला, तर दक्षता घेत ४० टीएमसी पाणी राखीव ठेवले आहे. त्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होणार नाही.
पाणलोट क्षेत्रात लवकर पाऊस
सिंचनासाठी कोयनेतील २१ टीएमसी पाणी देणे बाकी आहे. यापैकी काही पाणी सांगलीसाठी कोयना नदीपात्रातून सोडले आहे. या पाण्यावर सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या उपसा सिंचन योजना चालतात. या योजनांच्या रब्बी आणि उन्हाळी आवर्तनासाठी कोयना धरणातून, तर म्हैसाळ योजनेसाठी कोयना आणि वारणा धरणांतून पाण्याची तरतूद आहे. त्यानुसार पाणी सोडले आहे. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला लवकर सुरुवात होते. तसेच धरणात पाणी येण्यास लवकर सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टपर्यंत पुरेल इतके पाणी राखीव ठेवले जात आहे.
अलनिनोचा प्रभाव वाढल्यास पावसाचे प्रमाण कमी व अनियमित होते. याचाच परिणाम पुढील उन्हाळ्यात टंचाईच्या रूपात दिसून येतो. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे, त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
- महेश रसनकर, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग