वाहनाच्या ठोकरीत प्रौढाचा मृत्यू ; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील गणपतीपुळे ते चाफे मार्गावर अज्ञात वाहन चालकाने कुत्राला घेऊन वॉकिंगसाठी आलेल्या प्रौढाला ठोकर दिली. या अपघातामध्ये प्रौढाच्या डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देताच वाहन चालकाने पलायन केले. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. २८) सकाळी साडेसातच्या सुमारास गणपतीपुळे येथील हॉटेल एकदंत समोरील रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत राजेश मधुकर साळवी (वय ५६, रा. आर. सी. व्हिस्टा निअर केशवसुत स्मारक-मालगुंड, रत्नागिरी) हे सकाळी आपल्या कुत्र्याला घेऊन वॉकिंगसाठी रस्त्यावरुन जात असताना अज्ञात वाहन चालकाने त्यांना ठोकर दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. वाहन चालकाने अपघाताबाबत माहिती पोलिसांना न देताच पलायन केले. या प्रकरणी संतोष जयवंत देसाई (वय ४७, रा. मांजरे, देसाईवाडी, ता. संगमेश्वर) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.