रत्नागिरीत मिस्टर योगा, मिसेस योगिनी स्पर्धा संपन्न
प्रतीक पुजारी आणि राधिका पेडणेकर ठरले विजेते
रत्नागिरी : शिव योगा क्लासेस आणि राजेश सोहनी अँड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिस्टर योगा’ आणि ‘मिसेस योगिनी’ जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२६-२७ नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून ७० स्पर्धकांनी आपल्या योग कौशल्याचे सादरीकरण केले.
स्पर्धेचे उद्घाटन आगाशे एम्पायरचे मालक अनंत मुकुंद आगाशे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धेचे प्रायोजक राजेश रमेश सोहनी, राष्ट्रीय पंच रणवीर सावंत, डॉ. गौरव आंब्रे, योग प्रशिक्षक अशोक कुमठेकर, किरण संगरे, सौ. श्रद्धा जोशी, कु. अपूर्वा मुसळे आणि डॉ. सौ. कविता फासके उपस्थित होते. ही स्पर्धा पारंपरिक आसने आणि ‘मिस्टर योगा-मिसेस योगिनी’ अशा दोन विशेष प्रकारांत पार पडली.
या स्पर्धेत १० वर्षांखालील (मुली) ईशा आशुतोष गुर्जर, वीरा अमेय गांधी, अवनी जानकर, १० वर्षांखालील (मुले) आरुष अमोल पाटील, शौर्य स्वराज मगदूम, दक्ष महेंद्रसिंग राणा, १४ वर्षांखालील (मुली) राधिका मंदार पेडणेकर, दिया दिनकर सावर्डेकर, दुर्वा अमोल साळवी, १४ वर्षांखालील (मुले) आयुष विक्रांत पाटील, स्वरूप मनोज खेराडे, सोहम विजय बंडबे, १८ वर्षांखालील (मुली) सलोनी अमर शिर्के, श्रेया बळीराम तारे, १८ वर्षांखालील (मुले) प्रतिक पुरंदर पुजारी, रत्नेश हितेश अडिवरेकर, स्पंदन गौरव धामणे यांनी विविध गटात विजेतेपद मिळवले.
सर्व वयोगटांतील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या खेळाडूंमधून अंतिम फेरी घेण्यात आली. यामध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत प्रतिक पुरंदर पुजारी याने ‘मिस्टर योगा’ तर राधिका मंदार पेडणेकर हिने ‘मिसेस योगिनी’ हा मानाचा किताब पटकावला.
कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांचे पी.ए. तथा श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश सामंत उपस्थित होते. त्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना सन्मानित केले.