कंटेनर उलटून चालकाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल
लांजा :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा तालुक्यातील अंजणारी पुलाजवळ १४ टायरी कंटेनर ट्रेलर उलटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. २५ मार्च रोजी सायंकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, अवंतिका ट्रान्सपोर्ट, कळंबोली यांच्या मालकीचा १४ टायरी कंटेनर ट्रेलर (क्रमांक: MH 46 BB 2370) मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात होता. यावेळी लांजा येथील अंजणारी पुलाच्या मागील बाजूस असलेल्या उतारावरील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
वेग आणि उताराकडे दुर्लक्ष ठरले जीवघेणे
रस्ता उताराचा आणि वळणाचा असतानाही, चालक सुरेंद्र कुमार दुबे (वय ४८, सध्या रा. वडाळा, मुंबई; मूळ रा. उत्तरप्रदेश) यांनी वेगावर नियंत्रण राखले नाही. रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कंटेनर भरधाव वेगात चालवल्याने तो महामार्गावरच पलटी झाला. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने चालक सुरेंद्र कुमार दुबे यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी ट्रक चालक कोमल भआलीसिंग पटेल (वय ४०) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मयत चालक सुरेंद्र कुमार दुबे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), १०६(१) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.