रत्नागिरीतील प्रभाग क्र.४ मधील रस्त्यांचा प्रश्न गंभीर
८ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास ‘रस्ता रोको’चा इशारा!
रत्नागिरी: नगरपरिषद प्रभाग क्र. ४ मधील खराब रस्त्यांच्या समस्येने नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य झाले असून, या गंभीर प्रश्नावर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. प्रभागातील सर्व रस्ते आठ दिवसांच्या आत दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी सौ.शिवानी सावंत माने,स्थानिक नगरसेवक केतन शेट्ये, नगरसेविका फौजिया मुजावर,नगरसेवक अमित विलणकर, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, विजय देसाई, मयुरेश पाटील, शहर प्रमुख प्रशांत शंकरराव साळुंखे, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, नितीन तळेकर , सलील डाफले , दिलावर गोदड ,विशाल कदम सर ,साजिद पावसकर , प्रशांत सुर्वे , राजाराम रहाटे, सुफीयान जयगडकर , तन्वीर मुजावर, प्रसन्न सुर्वे , अक्षय कांबळे, इम्रान मुकादम यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोकणनगर, कीर्तनगर, क्रांतिनगर तसेच स्टेट बँक कॉलनी परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या संदर्भात स्थानिक नगरसेवक केतन शेटये यांनी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास ही बाब आणूनही अद्याप रस्त्यांची दुरुस्ती झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून, हा प्रश्न आता जीवितास धोका निर्माण करणारा ठरत आहे.
यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष देत सर्व रस्त्यांची दुरुस्ती किंवा नूतनीकरण आठ दिवसांत पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र ‘रस्ता रोको’आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.