पाण्याचे पंप चोरी प्रकरणी चौघांना अटक
मंडणगड शिरगाव परिसरातील घटना
मंडणगड:
तालुक्यातील शिरगाव परिसरातून पाण्याचे इलेक्ट्रीक पंप चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. शिरगाव गोमुख आणि शिरगाव धर्मा या दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून ५ एचपी आणि १२ एचपी क्षमतेचे दोन पंप चोरल्याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
शिरगाव गोमुख येथील पंपचालक सुनील मधुकर पाटील (वय ४६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पंप हाऊसच्या दरवाजाच्या फळ्या उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी तेथील १० हजार रुपये किमतीचा ५ एचपी क्षमतेचा बंद इलेक्ट्रीक पंप चोरून नेला. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, शिरगाव धर्मा येथील शेतकरी आत्माराम तुकाराम जोंधळे (वय ६२) यांचा १२ एचपीचा दुरुस्त करून ठेवलेला पंप चोरीला गेला. चोरट्यांनी पंप हाऊसचा सिमेंटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि २० हजार रुपये किमतीचा हा मोठा पंप लंपास केला. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २९/२०२६ नुसार तक्रार दाखल झाली आहे.
रायगड आणि सातारच्या चौघांना बेड्या
या दोन्ही चोरीच्या प्रकरणांत पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून सिकंदर रमेश कनोजिया (वय ३०, रा. महाड, मूळ – उत्तर प्रदेश), मोहित रमेश कनोजिया (वय २१, रा. महाड, मूळ – उत्तर प्रदेश), आकाश प्रकाश पवार (वय २५, रा. आकले, जि. सातारा), अविनाश दीपक जाधव (वय २४, रा. आकले, जि. सातारा) या चार आरोपींना अटक केली.
या आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या टोळीने अन्य काही ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.