सावर्डे पोलिसांची कुटरे येथे कारवाई; जांभी नदीकाठी हातभट्टीची दारू जप्त
सावर्डे:
चिपळूण तालुक्यातील कुटरे खालचीपेठ येथे जांभी नदीच्या किनारी बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू तयार करून त्याची विक्री करणाऱ्या एका ५६ वर्षीय इसमावर सावर्डे पोलिसांनी कारवाई केली आहे. २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पांगेराच्या झाडाच्या आडोशाला सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी आरोपी सुनील श्रीपत सावंत (रा. कुटरे खैरवाडी) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावर्डे पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार नीता रोहित गमरे यांना कुटरे येथील नदीकाठी अवैध दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सायंकाळी ६.४५ वाजता त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी आरोपी सुनील सावंत हा कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू आपल्या ताब्यात बाळगून त्याची विक्री करताना रंगेहाथ मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून ५५० रुपये किमतीची ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि इतर साहित्य असा एकूण ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात २७ मार्च रोजी रात्री ७.२९ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस हवालदार नीता गमरे यांनी फिर्याद दिली आहे. ग्रामीण भागात नदीकाठच्या आडोशाचा फायदा घेऊन अशा प्रकारे अवैध दारूचे धंदे फोफावत असल्याचे या कारवाईवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. सावर्डे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, परिसरातील इतर अवैध धंद्यांवरही कडक नजर ठेवली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.