बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर
दापोली : दापोली-खेड मार्गावरील वाकवली शिरशिंगेफाटा येथे बुधवारी (ता. २५) रात्री भीषण अपघात घडला. एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी बसचालकाविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूरहून दापोलीकडे येणारी एसटी बस रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास वाकवली शिरशिंगेफाटा येथे आली असता चालक
स्वप्नील बाळकृष्ण माने हे बस भरधाव वेगात तसेच चुकीच्या बाजूने चालवत होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार गणेश नंदकुमार सातनाक (वय ४२, रा. वाकवली) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेप्रकरणी लक्ष्मण विठ्ठल नाटेकर (४८) यांनी दापोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.