एम. एन. जोशी स्कूलमध्ये अटलबिहारी वाजपेयी स्मृती सभागृहाचे नामकरण.
रत्नागिरी : भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित गुरुवर्य एम. एन. जोशी इंग्लिश मिडियम स्कूलच्या सांस्कृतिक सभागृहाचे नामकरण माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी स्मृती सभागृह असे करण्यात आले. अटलजींना भारतरत्न सर्वोच्च सन्मान बरोब्बर ११ वर्षापूर्वी प्राप्त झाला होता. त्याचेही आज स्मरण झाले व अटलजींची स्मृती जपली गेली आहे. यापुढेही संस्थेला लागणारी सर्व ती मदत देऊ, असे प्रतिपादन भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले.
आज सकाळी जोशी स्कूलमध्ये नामकरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबा परुळेकर, उपाध्यक्ष ॲड. विनय आंबुलकर, ॲड. सुमिता भावे, कार्याध्यक्ष दाक्षायणी बोपर्डीकर, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, जिल्हा व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते, कौन्सिल सदस्य उपस्थित होते.
नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी १०४ वर्षांच्या या संस्थेचा आता महावृक्ष झाला असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. या वेळी ॲड. परुळेकर म्हणाले की, गुरुवर्य एम्. एन्. जोशी इंग्लिश मिडियम स्कूलची दशकपूर्ती १ एप्रिल रोजी होत आहे. वाजपेयीजी यांना २७ मार्च २०१५ रोजी भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. त्या दिवसाचा आज ११ वा वर्धापनदिन आहे. कोकणामध्ये वाजपेयींच्या योगदानाची आठवण करून देणारी व भावी पिढीला सुयोग्य दिशा देणारी प्रेरणास्थाने उभारली जावीत अशी संकल्पना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी मांडली. त्या अनुषंगाने सभागृहाचे नामकरण करण्यात आले.
कार्याध्यक्ष सौ. दाक्षायणी बोपर्डीकर यांनी सांगितले की, २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात संस्थेने इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा श्रीगणेशा केला. अस्सल भारतीय परंपरा जपत इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या या विद्याशाखेसाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून स्वतंत्र, सुसज्ज इमारत उभारण्यात आली. फाटक हायस्कूलचे माजी उपमुख्याध्यापक व संस्थेचे आधारस्तंभ असलेले कै. एम. एन. जोशी यांच्या वैचारिक व आर्थिक पाठबळामुळे आकार घेतलेल्या या शाळेला त्यांच्या नावाने अलंकृत केले गेले आहे. फाटक गुरुजी, एम. एम. जोशी आणि अटलजींच्या राष्ट्रीय विचारांमुळे आज सभागृहाचे नामकरण होताना आनंद होत आहे.
कार्यक्रमानिमित्त अटलजींच्या १९७० व १९९८ मधील रत्नागिरी भेटीच्या व अटलजींना महामहिम राष्ट्रपतींनी भारतरत्न प्रदान करतानाच्या ऐतिहासिक क्षणांच्या स्मृती चित्रफितीच्या माध्यमातून जागवल्या. प्रमुख पाहुण्यांसह माजी कौन्सिल सदस्य व बांधकाम व्यावसायिक प्रसाद वाघधरे आणि आर्किटेक्ट शिरीष घोरपडे, तसेच सहसचिव शेखर लेले यांचा विशेष सन्मान अॅड. परुळेकर यांनी केला. पद्मश्री आठल्ये यांनी सूत्रसंचालन केले. तर सहसचिव शेखर लेले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, भाजपा पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.