जुन्या वादातून तरुणाला बिअर बारमध्ये बेदम मारहाण
चिपळूण:
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील ‘हॉटेल गुडलक बिअर बार’मध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका ड्रायव्हरला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रदीप शिवराम जाधव (वय ४९), रा. सावर्डे हे दोन महिन्यांपूर्वी बिअर पार्सल घेण्यासाठी गेले असताना, तेथे उपस्थित असलेल्या एका आरोपीशी त्यांचा ‘दारू मिळणार नाही’ या कारणावरून वाद झाला होता.
२३ मार्च रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास प्रदीप जाधव पुन्हा सावर्डे येथील ‘गुडलक बिअर बार’च्या काउंटरवर बिअर घेण्यासाठी गेले होते. यावेळी जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना घेरले.
आरोपी रेखा आत्माराम मोहिरे यांनी फिर्यादीला पकडून ठेवले, तर उभयचंद मोहिरे आणि प्रितेश मोहिरे यांनी त्यांना काठीने, हाताच्या ठोशांनी आणि लाथाबुक्क्यांनी डोक्यात, पाठीवर, मानेवर, डोळ्यावर आणि पोटावर बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर फिर्यादीला जमिनीवर पाडून त्यांच्याच पायातील बुटाने त्यांच्या डोक्यावर व कानाखाली प्रहार करण्यात आले.
या हाणामारीत प्रदीप जाधव यांचा डोळ्यांवरील चष्मा फुटला असून, त्यांच्या गळ्यातील रुद्राक्ष माळ, हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याचे ब्रेसलेट व ब्लूटूथ तोडून त्यांचे आर्थिक नुकसान करण्यात आले आहे. मारहाण एवढ्यावरच थांबली नाही, तर आरोपींनी फिर्यादीच्या घरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. तेथे त्यांच्या पत्नीलाही अश्लील शिवीगाळ करून पुन्हा एकदा फिर्यादीला हाताच्या थापटाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या गंभीर प्रकारानंतर प्रदीप जाधव यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी २५ मार्च रोजी रात्री ९:२१ वाजता भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.