चिपळूणमध्ये मद्यधुंद चालकाचा थरार
बायपास रोडवर भरधाव कार झाडाझुडपात घुसली
चिपळूण: चिपळूण-गुहागर बायपास रोडवरील खंड पांडवलेणी परिसरात एका मद्यधुंद चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिवेगाने चालवून अपघात केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी असलेला चालक मंगेश नितीन टोके (वय ३० वर्षे) हा मद्यधुंद अवस्थेत आपली कार (क्रमांक माहित नाही) चिपळूण-गुहागर बायपास रोडवरून अतिशय वेगाने आणि धोकादायकरित्या चालवत होता.
नियंत्रण सुटल्याने कार डांबरी रस्त्यावरून खाली उतरली आणि शेजारील कच्च्या रस्त्यावरून थेट झाडाझुडपात व जाळीमध्ये जाऊन शिरली. या भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या इतर प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गाडी चालवल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल विजय किसन भालेकर (बक्कल नंबर ८९०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध २०२३ चे कलम १८४, १८५ कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे: