शिमग्यासाठी आलेल्या चाकरमान्याचा उपचारादरम्यान मृत्यू
खेड तालुक्यातील चिचघर गावावर शोककळा
खेड: शिमगोत्सवासाठी मुंबईहून आपल्या मूळ गावी आलेल्या एका ६६ वर्षीय चाकरमान्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पांडुरंग रावजी शिवे (वय ६६, सध्या रा. कांदिवली, मुंबई; मूळ रा. चिचघर तांबटवाडी, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेली माहिती अशी की, पांडुरंग शिवे हे कांदिवली येथील रहिवासी असून शिमगा सणाचे औचित्य साधून ते आपल्या कुटुंबासह खेड तालुक्यातील चिचघर तांबटवाडी या मूळ गावी आले होते. गेल्या महिन्याभरापासून त्यांना काविळीचा त्रास होत असल्याने ते शारीरिकदृष्ट्या अशक्त झाले होते.
१२ मार्च रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास पांडुरंग शिवे हे बाथरूमला जात असताना त्यांना अचानक चक्कर आली. यावेळी त्यांचा मुलगा संतोष शिवे यांनी त्यांना सावरले, मात्र त्यानंतर त्यांना रक्ताची उलटी झाली. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कळंबणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चिपळूण येथील वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना रुग्णवाहिकेतून डेरवण येथे नेऊन दाखल करण्यात आले. मात्र, १६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत सुरुवातीला सावर्डे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंदवण्यात आला होता. आज रोजी सर्व कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर खेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक १३/२०२६ नुसार बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.