रिक्षा मेकॅनिकच्या मुलीचे सीए परीक्षेत देदीप्यमान यश
रत्नागिरी : कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करता येते, हे रत्नागिरीच्या वैभवी लहू शिंदे हिने सिद्ध करून दाखवले आहे. देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) परीक्षेत वैभवीने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले असून, तिच्या या यशाने संपूर्ण जिल्ह्यातून तिचे कौतुक होत आहे.
वैभवीचे वडील लहू शिंदे यांचा रिक्षा दुरुस्तीचा ( गॅरेज ) व्यवसाय आहे.घरची परिस्थिती बेताची असतानाही वैभवीने कधीही आपले ध्येय विचलित होऊ दिले नाही. वडिलांच्या कष्टाचे चीज करायचे, या एकाच उद्देशाने तिने अभ्यासात सातत्य ठेवले. वैभवीने या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ७६ गुण मिळवून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली आहे.
वैभवीचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीमध्येच पूर्ण झाले.बारावी पूर्ण झाल्यानंतर तिने सीए व्हायचे निश्चित केले होते. घरच्यांनीही तिच्या या निर्णयाला पूर्ण पाठबळ दिले.
कोणतीही मोठी स्वप्ने पाहताना कौटुंबिक पाठिंबा किती महत्त्वाचा असतो याचे वैभवी हे उत्तम उदाहरण ठरली आहे.सीए परीक्षा कठीण असली तरी, योग्य नियोजन आणि चिकाटी असेल तर यश नक्की मिळते.माझ्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या कष्टाला आणि त्यांच्या विश्वासाला आहे.
वैभवीच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, तिने अनेक गरजू आणि कष्टाळू विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.