भुईबावडा येथे युवकाला दांडक्याने बेदम मारहाण
राजापूर:
तालुक्यातील भुईबावडा परिसरात एका १६ वर्षीय मुलाला त्याच्याच मित्राने लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचा १६ वर्षीय मुलगा ग्वेद दिलीप शेरे हा कामावरून ट्रॅव्हल्स गाडीने उतरला होता. त्यानंतर तो आपला मित्र मनिष राजाराम आरडे (रा. काजिर्डा, राजापूर) याच्यासोबत मोटारसायकलवरून घरी जाण्यासाठी निघाला.
दिनांक १५ मार्च रोजी सकाळी ८:०० ते दुपारी २:३० च्या दरम्यान, भुईबावडा येथील रस्त्याजवळ आरोपी मनिष आरडे याने गाडी थांबवून ग्वेद याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत ग्वेद याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला, डाव्या कानावर आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. आपल्या मुलाला मनिषनेच संशयास्पद रित्या मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.
या घटनेनंतर फिर्यादींनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास चक्रावून दि. १७ मार्च रोजी दुपारी २:४६ वाजता गुन्हा नोंद केला आहे.
मित्रानेच अशा प्रकारे अल्पवयीन मुलावर हल्ला केल्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या मारहाणीचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.