कोर्ले फाट्याजवळ जखमी अवस्थेत सापडलेल्या मतिमंद वृद्धाचा मृत्यू
लांजा:
लांजा तालुक्यातील तेलीवाडी येथील एका ७५ वर्षीय मतिमंद वृद्धाचा रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोर्ले फाट्याजवळ जखमी अवस्थेत आढळल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.
अन्वर इब्राहिम खतीब (वय ७५ वर्षे, रा. तेलीवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. अन्वर हे जन्मापासून मतिमंद होते. मंगळवार, १० मार्च रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास ते कोर्ले फाट्याच्या पुढे सार्दळ यांच्या दुकानाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी जखमी अवस्थेत मिळून आले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता आणि कानातून रक्त येत होते.
स्थानिक नागरिक वसीम मुजावर यांनी या घटनेची माहिती अन्वर यांचे भाऊ बशीर अली इब्राहिम खतीब यांना दिली. जखमी अन्वर यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, लांजा येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे हलवण्यात आले.
जिल्हा रुग्णालयातील आय.सी.यु. विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असताना, गुरुवारी सकाळी ६:३० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी बशीर अली इब्राहिम खतीब यांनी दिलेल्या माहितीवरून रत्नागिरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.