वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने पोलिसांच्या रडारवर
गुहागर, राजापूर आणि मंडणगडमध्ये गुन्हे दाखल
रत्नागिरी:-
रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम राबवली आहे. शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी गुहागर, राजापूर आणि मंडणगड परिसरात अशा प्रकारच्या पाच वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या.
गुहागर-चिपळूण रोडवरील जानवळे फाट्यासमोर महिंद्रा मॅक्झिमो (MH 08 E 2758) ही गाडी धोकादायक पद्धतीने उभी केल्याप्रकरणी चालक राहुल रवींद्र बावधनकर (रा. गुहागर) याच्यावर गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई प्रितेश रहाटे यांनी ही फिर्याद दिली.
राजापूर शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी करणाऱ्या काळ्या रंगाची झायलो (MH 03 AR 5957) उभी केल्याप्रकरणी गणेश लघू पाटील (रा. जुवाठी) याच्यावर, पांढऱ्या रंगाची टाटा टिगोर (MH 10 E 30148) उभी करून धोका निर्माण केल्याप्रकरणी विनोद विद्याधर घाटे (रा. वैभववाडी) याच्यावर गुन्हा दाखल, निळ्या रंगाची मारुती इको (MH 02 CD 4249) रस्त्यात उभी केल्याप्रकरणी स्वप्निल पांडुरंग चिपटे (रा. पेंडखळे) याच्यावर कारवाई अशी तीन वाहनचालकांवर राजापूर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.
मंडणगड तालुक्यातील वेसवी नाका येथे सार्वजनिक रोडवर महिंद्रा बोलेरो (MH 06 AC 5314) ही गाडी अडथळा ठरेल अशा स्थितीत उभी केल्याबद्दल चालक अंकुश भीमराव पोवार (रा. पाटरोड, मंडणगड) याच्यावर बाणकोट पोलिसांनी कारवाई केली आहे.
या सर्व प्रकरणांत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मानवी जीविताला धोका निर्माण होईल किंवा वाहतुकीस अडथळा येईल अशा पद्धतीने वाहन उभे करणे आता वाहनचालकांना महागात पडत आहे.