मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे ९० टक्के काम पूर्ण
मार्च २०२६ पर्यंत रस्ता सज्ज होणार!
रत्नागिरी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गच्या पहिल्या टप्प्याचे काम आता अंतिम वळणावर आले आहे. मिरज-हातखंबा आणि पाली-आंबा या ५५.९०९ किमी अंतराच्या चौपदरीकरणाचे काम ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून, येत्या मार्च २०२६ पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः खुला करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
हा प्रकल्प ‘हायब्रिड ऍन्युइटी’ मोडअंतर्गत रवी इन्फ्राबिल्ड प्रोजेक्ट्स लिमिटेड यांच्यामार्फत राबविला जात आहे. मुख्य ५३.९ किमी मार्गापैकी तब्बल ४८ किमी अंतराचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित छोट्या पट्ट्यांमधील कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. महामार्गालगतच्या गावांसाठी १५.३६ किमी लांबीचे सेवा रस्ते नियोजित असून त्यातील १० किमीचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे, ज्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रस्त्याच्या कामात येणारे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी ‘युटिलिटी शिफ्टिंग’चे कामही शेवटच्या टप्प्यात आहे. यात
३७.६ किमी पैकी ३५.७ किमी हाय-टेन्शन आणि लो-टेन्शन लाईन्सचे यशस्वी स्थलांतर करण्यात आले. तसेच ३०.०४ किमी पैकी २६.२ किमी लांबीच्या वाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे.
काही ठिकाणी जमीन संपादनाचे विषय प्रलंबित असल्याने आणि ‘चेंज ऑफ स्कोप’ मुळे सुरुवातीला काहीसा विलंब झाला होता. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यावर तातडीने तोडगा काढत पावसाळ्यापूर्वी ही सर्व प्रलंबित कामे उरकण्याचे संकेत दिले आहेत.
हा महामार्ग पूर्णत्वास गेल्यावर घाटमाथ्यावर जाणारी अवजड वाहतूक आणि पर्यटकांचा वेळ वाचणार आहे.
चौपदरीकरणामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित होईल. या महामार्गामुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेला आणि व्यापाराला मोठी गती मिळणार आहे.
मार्च २०२६ पर्यंत मुख्य संरचना आणि युटिलिटीची कामे पूर्ण करून तांत्रिक तपासणीनंतर ‘पी-सीओडी’ प्राप्त केली जाईल.