रत्नागिरीत पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी १ हजार १०३ उमेदवार रिंगणात
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील ‘पोलीस शिपाई’ पदांसाठीची शारीरिक चाचणी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष लेखी परीक्षेकडे लागले आहे. ही लेखी परीक्षा रविवार, दिनांक १५ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता रत्नागिरी शहरातील दोन केंद्रांवर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या खडतर शारीरिक चाचणीतून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 786 पुरुष उमेदवार तर 317 महिला उमेदवार असे एकूण 1 हजार 103 उमेदवार लेखी परिक्षेकरीता पात्र ठरले आहेत.
रत्नागिरी शहरातील खालील दोन महत्त्वाच्या केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. यामध्ये फिनोलेक्स कॉलेज, एम.आय.डी.सी. मिरजोळे आणि श्री. शामराव पेजे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, थिबा पॅलेस या दोन परीक्षा केंद्रांवर ही लेखी परीक्षा होणार आहे.
पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे. परीक्षा अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त आणि नियोजन केले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व तरुण-तरुणींना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर हजर राहण्याचे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.