हर्णे येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या
कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल
दापोली :
दापोली तालुक्यातील हर्णे-मोठीगोडीबाव येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या व्यसनामुळे घरात होणाऱ्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश सुरेश वाघमारे (वय ४२, रा. मोठीगोडीबाव, हर्णे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. रुपेश याला दारू पिण्याचे व्यसन होते. याच कारणावरून त्याचे आणि त्याच्या पत्नीचे वारंवार खटके उडत होते. १० मार्च रोजी याच वादातून रुपेशने आपल्या राहत्या घराच्या वरील मजल्यावरील खोलीत जाऊन छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.
डॉक्टरांनी मृत घोषित केले
ही घटना निदर्शनास येताच नातेवाईकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून रुपेशला उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे हलवले. मात्र, दुपारी ३ च्या सुमारास रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी मयत रुपेशची आई सुरेखा सुरेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीवरून दापोली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.