हर्णैमध्ये वृद्धेचा आगीच्या भडक्यात भाजून मृत्यू
दापोली : तालुक्यातील हर्णे येथील गोडी बाव परिसरात राहणाऱ्या शेवंती बाळकृष्ण चौधरी ( ६७) यांचा आगीच्या भडक्यात भाजून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवंती चौधरी या घरात अंघोळीसाठी पाणी गरम करत होत्या. यावेळी अचानक आगीचा भडका उडाल्याने त्यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. त्यामुळे त्या गंभीररीत्या भाजल्या. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी हर्णे येथील डॉ. अंतुले यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारांसाठी रुग्णवाहिकेद्वारे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हर्णे परिसरात शोककळा पसरली आहे.