पाली येथे अज्ञाताने लंपास केले ५३ हजार
रत्नागिरी:
रत्नागिरी तालुक्यातील पाली माईनवाडी परिसरात एक घरफोडीची घटना समोर आली आहे. घरमालक आपल्या आईच्या उपचारासाठी मुंबईला गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप कापून कपाटातील ५३,७५० रुपयांची रोकड चोरून नेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुर्गेश रामदास पाटील (वय २५, रा. श्री साई निवास, पाली माईनवाडी) हे २ मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास आपल्या आईला उपचारासाठी मुंबईतील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. यावेळी त्यांनी घराच्या सर्व दरवाजांना कुलूप लावले होते. दिनांक २ मार्च ते ८ मार्च या कालावधीत घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने संधी साधली. चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप ‘एक्झो ब्लेड’ने कापून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उचकटून त्यातील रोख रक्कम आणि नाणी असा एकूण ५३,७५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
दुर्गेश पाटील यांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यात १० मार्च रोजी दुपारी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ च्या कलम ३३१ (३), ३३१ (४), कलम ३०५(अ) या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.