लांजा येथे बेकायदेशीर दारू विक्रीवर कारवाई
गावठी हातभट्टीसह विदेशी दारूसाठा जप्त
लांजा:
तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील बौद्धवाडी परिसरातील स्मशानभूमीसमोर असलेल्या एका शेडमध्ये बेकायदेशीररीत्या दारूची विक्री करणाऱ्या आरोपीवर लांजा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गावठी हातभट्टीसह देशी-विदेशी दारू आणि बिअर असा एकूण ६ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शनिवार, ७ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई (चालक) विष्णू अरुण मांजरेकर (वय ३४) व त्यांच्या पथकाने वेरवली बुद्रुक येथील स्मशानभूमीसमोरील रोड शेजारी असलेल्या एका शेडवर छापा टाकला. यावेळी आरोपी सहदेव भिवा करळकर (वय ४७, रा. वेरवली बुद्रुक) हा विनापरवाना दारूची विक्री करण्यासाठी साठा बाळगून असताना रंगेहात पकडला गेला.
याप्रकरणी आरोपी सहदेव करळकर याच्याविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ मार्च रोजी रात्री १० वाजता या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत गावठी दारू, हातभट्टीची दारू, विदेशी दारू व बिअर अशा प्रकारे एकूण ६,१७५ रुपयांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.