खेड येथे कार- दुचाकीची धडक; तिघे जखमी
खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील काशिमठ नजीक काळकाई हॉटेल समोर शनिवारी (दि. ७ मार्च) दुपारी कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात तीन युवक जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात दुपारी सुमारे ३.४८ वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, विनेरे येथून खेडच्या दिशेने येत असलेल्या मोटारसायकलसमोर अचानक डिव्हायडर क्रॉस करण्यासाठी एक कार आली. कारने अचानक वळण घेतल्यामुळे मोटारसायकल चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी थेट कारवर जाऊन धडकली. या धडकेत दुचाकीवरील तिघे युवक जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली उभी असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणिज धाम यांची २४ तास अपघात मदतीसाठी कार्यरत असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले.
या अपघातात चैतन्य रमेश पवार (वय २५), किरण गणेश पवार (वय २३) आणि संकेत अनंत पवार (वय २४) हे तिघेही युवक जखमी झाले असून ते सर्व विनेरे येथील रहिवासी आहेत. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असून जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अशा अपघातांची शक्यता वाढत असून वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.