हृदयविकाराच्या झटक्याने कामगाराचा मृत्यू
दापोली : तालुक्यातील लाडघर येथील एका रिसॉर्टमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. जिन्यावरून पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. सद्दाम यासिन मुरूडकर (३४, रा. टांगर) असे या तरुणाचे नाव आहे. सद्दाम यासिन मुरुडकर हा बुधवारी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या जिन्यावरून खाली पडलेल्या अवस्थेत आढळला. पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला. सहकाऱ्यांना हे समजताच त्यांनी त्याला तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दुपारी सुमारे १२.४० वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ऐन रमजान महिन्यातच मुरुडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील एकमेव कमवता सदस्य असलेल्या सद्दाम यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.