राज्य नाट्यच्या अंतिम फेरीत डोंबिवलीच्या ‘दगडी भिंत’ नाटकाचा डंका
पटकावले ६ लाखांचे प्रथम पारितोषिक
रत्नागिरी: सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला असून, डोंबिवलीच्या श्रीकला संस्कार न्यास संस्थेच्या ‘दगडी भिंत’ या नाटकाने प्रथम क्रमांकाचे ६ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावून बाजी मारली आहे.
रत्नागिरी येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. या दिमाखदार सोहळ्यात एकूण ४६ नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले होते. जाहीर झालेल्या निकालात श्रीकला संस्कार न्यास, डोंबिवली संस्थेच्या दगडी भिंत नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावत सहा लाखांचे बक्षीस जिंकले. नटराज नाट्य कला मंडळ, बारामती संस्थेच्या कर्ण नाटकाने द्वितीय क्रमांक पटकावत चार लाखांचे तर नवहिंद बालमित्र मंडळ, मुंबई संस्थेच्या द हिंदू लेडी नाटकाने तृतीय क्रमांक पटकावत दोन लाखांचे पारितोषिक पटकावले. तांत्रिक आणि अभिनयाच्या विभागातही ‘दगडी भिंत’ नाटकाचे वर्चस्व राहिले.
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदकसाठी पुरुष कलाकारांमध्ये हर्षवर्धन कारंडे-देशमुख (मी कुमार), मिनार पाटील (अग्नीपंख), प्रा. दिपक आमोलकर (द लास्ट सेल) यांच्यासह १० कलाकारांना गौरवण्यात आले.
महिला कलाकारांमध्ये श्रुती गणपुले (दगडी भिंत), कल्पिता राणे (कर्ण), निखिला इनामदार (दगडी भिंत), शिवानी पेडणेकर (द हिंदू लेडी) यांच्यासह १० अभिनेत्रींनी रौप्यपदक पटकावले.