संगमेश्वरातील पहिली आंबा पेटी पुण्यात
संगमेश्वर: संगमेश्वर खाडीपट्ट्यातील यंदाच्या हंगामातील पहिली आंबा पेटी पुणे बाजारपेठेत रवाना झाली असून, हा मान परचुरी गावचे शरद गोणबरे आणि विपुल गोणबरे यांनी मिळवला आहे.
४ मार्च रोजी त्यांनी ही पहिली पेटी पुणे येथील प्रसिद्ध ‘लक्ष्मीनारायण’ व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी पाठविली. हवामानातील बदलांचे सावट असतानाही, मेहनतीच्या जोरावर गोणबरे बंधूंनी आंबा तयार करून तो बाजारपेठेत पोहोचवला आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील इतर बागायतदारांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिली पेटी रवाना झाल्यानिमित्त गोणबरे बंधूंचे कृषी क्षेत्रातून आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. खाडीपट्ट्यातील या पहिल्या आंबा पेटीच्या रवानगीमुळे आता लवकरच पुण्यासह इतर बाजारपेठांमध्येही कोकणचा हापूस मोठ्या प्रमाणावर दाखल होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.