जालगाव येथे अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याला अटक
दापोली :
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. जालगाव पांगारवाडी येथे राहत्या घरी गांजाचे सेवन करताना एका ५१ वर्षीय व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
बुधवार, ४ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दापोली पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल बळीराम बालाजी चोंडे (वय ३०) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जालगाव पांगारवाडी येथील घर क्रमांक ४५३ मध्ये एक व्यक्ती अमली पदार्थाचे सेवन करत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, राजेंद्र अनंत घाग (वय ५१, रा. पांगारवाडी, जालगाव) हा इसम गांजा या अमली पदार्थाचे सेवन करत असताना मिळून आला.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी राजेंद्र घाग याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१/२०२६ अन्वये अमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ च्या कलम ८(क) आणि २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.