लांजा येथे उघड्यावर खाद्यपदार्थ बनवणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल
लांजा:
मुंबई-गोवा महामार्गावरील साटवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, पुलाच्या नवीन बांधकामाखाली उघड्यावर गॅस शेगडीचा वापर करून धोकादायक पद्धतीने खाद्यपदार्थ बनवणाऱ्या एका विक्रेत्यावर लांजा पोलिसांनी कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी ज्वालाग्राही पदार्थांच्या बाबतीत हयगय करून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार, १ मार्च रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल अविनाश कदम (वय ३४) हे गस्तीवर असताना त्यांना साटवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाखाली एक विक्रेता उघड्यावर व्यवसाय करताना आढळला. आरोपी तेजस चंद्रकांत पातारे (वय २८, रा. वेरळ पातेरेवाडी, ता. लांजा) हा सार्वजनिक रस्त्याच्या मध्यभागी गॅस सिलेंडर आणि शेगडीचा वापर करून खाद्यपदार्थ बनवून ग्राहकांना विक्री करत होता.
ज्या ठिकाणी हे पदार्थ बनवले जात होते, तिथे पुलाचे बांधकाम सुरू असून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. उघड्यावर गॅसचा वापर केल्यामुळे अचानक आग लागून येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींना दुखापत किंवा मालमत्तेचे नुकसान होण्याची दाट शक्यता होती. ज्वालाग्राही पदार्थांच्या बाबतीत दाखवलेल्या या बेजबाबदारपणामुळे पोलिसांनी ही कारवाई केली.
याप्रकरणी फिर्यादी स्वप्निल कदम यांच्या तक्रारीवरून लांजा पोलीस ठाण्यात आरोपी तेजस पातारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८७ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे ५ वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.