दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
दुचाकीस्वारावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लांजा:
खडीवरून मोटरसायकल घसरून मागे बसलेली २५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याने लांजा पोलिसांनी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर लांजा कुंभारवाडी येथील निरंकारी सत्संग मठाजवळ घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद सचिन शिवाजी मदने (३२, मूळ रा.सुभाष नगर माळगाव रोड, मिरज, जि.सांगली व सध्या रा.कोट, ता. लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेतील संतोष शिवाजी मदने (२५, मूळ रा. सुभाष नगर माळगाव, मिरज, जि. सांगली) हा २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक (एमएच १० ईयु७२८२) घेऊन कोट ते लांजा असा येत होता. त्याच्या मागे सविता सचिन मदने (२५, मूळ रा.सुभाष नगर माळगाव रोड मिरज, जि. सांगली) व तिचा मुलगा सार्थक (३) असे दोघेजण बसले होते.
ही दुचाकी मुंबई-गोवा महामार्गावर लांजा कुंभारवाडी येथील निरंकारी सत्संग मठाचे मागील उतारा ठिकाणी आली असता रस्त्याचे कामाकरिता टाकलेल्या खडीवरून मोटरसायकल हयगयीने आणि निष्काळजीपणे वेगाने चालवल्यामुळे व मोटरसायकल घसरून पाठीमागे बसलेली सविता सचिन मदने ही तोल जाऊन खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला तातडीने मिरज या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यां ठिकाणी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मोटरसायकलस्वार संतोष शिवाजी मदने याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ) व (ब), १०६ (१). मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.