तरुणाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा
म्हाप्रळ बौद्धवाडी येथील घटना
मंडणगड (प्रतिनिधी):
मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ बौद्धवाडी येथे रविवारी सकाळी एका भरधाव ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेत एका २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
ही घटना रविवार, १ मार्च रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी शुभम महेश कोकणे (वय २५, रा. घाटकोपर, मुंबई) आणि त्याचा मित्र साहिल विजय बेंद्रे (वय २३) हे प्रवास करत असताना, म्हाप्रळ बौद्धवाडी परिसरात समोरून येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सने त्यांना जोरदार धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रॅव्हल्स चालक जुगल विलास बोवलेकर (वय ३५, रा. वसई, जि. पालघर) हा आपली ट्रॅव्हल्स (गाडी क्र. MH-48-CQ-0444) घेऊन जात होता. रस्त्याची परिस्थिती आणि वळण लक्षात न घेता, त्याने अतिवेगाने आणि बेदरकारपणे गाडी चालवून समोरून येणाऱ्या साहिल बेंद्रे याच्या गाडीला जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात साहिल विजय बेंद्रे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर फिर्यादी शुभम कोकणे हा देखील या अपघातात जखमी झाला आहे. अवघ्या २३ वर्षांच्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी शुभम कोकणे याने दिलेल्या फिर्यादीवरून मंडणगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅव्हल्स चालकावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (निष्काळजीपणामुळे मृत्यू), १२५(a), १२५(b), २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.