हर्णे येथे मासेमारीदरम्यान कामगाराचा मृत्यू
दापोली : तालुक्यातील हर्णे बंदर परिसरात समुद्रात मासेमारी करत असताना एका खलाशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणी दापोली पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
रामराज चंद्रबली राजभर (वय ५६, रा. हर्णे बंदर) हे हर्णे येथील पांडुरंग मनोहर चोगले यांच्या बोटीवर खलाशी म्हणून काम करत होते. २७ फेब्रुवारीला दुपारी अडीचच्या सुमारास मासेमारी करत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यावेळी बोटीवरील तांडेल जयंत गोपाळ चोगले यांनी तत्काळ बोट बंदराकडे वळवली. बोट मालक पांडुरंग चोगले यांना दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. बंदरात आल्यानंतर पांडुरंग चोगले व सर्व खलाशांनी स्थानिक डॉक्टरांकडे नेले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची खबर जावेद गोपाळ चोगले यांनी दापोली पोलिसात दिली.