जिल्ह्यात वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने पोलिसांच्या रडारवर
राजापूर आणि दापोलीत गुन्हे दाखल
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेस अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली आहे. २६ फेब्रुवारी रोजी राजापूर आणि दापोली परिसरात केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये तीन वाहनचालकांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राजापूर तालुक्यातील ओणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील सर्व्हिस रोडवर सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने आपली टाटा ‘छोटा हत्ती’ (क्र. MH 10 CR 1514) उभी केल्याप्रकरणी मोहन बाबुराव पाचंगी (वय २९, रा. ओणी, मूळ जि. विजापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई संभाजी विलास कदम यांनी ही कारवाई केली.
राजापूर येथील रियाज स्ट्रीट कॅफेसमोर एका काळ्या-पिवळ्या रंगाच्या रिक्षाने (क्र. MH 08 BC 0648) रस्ता अडवल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी रिक्षाचालक शेखर लाल्या तावडे (वय २६, रा. कोंड्चेतड, राजापूर) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिला पोलीस शिपाई प्रतीक्षा लक्ष्मण कोंडवळ यांनी ही फिर्याद दिली आहे.
दापोली ते हर्णे या मुख्य मार्गावर उपजिल्हा रुग्णालयासमोर आपली मॅक्झिमो चारचाकी गाडी (क्र. MH 15 CK 9773) उभी करून चालक शिल्पेश किसन बैकर (वय ३५, रा. खेर्डी, दापोली) हा कुठेतरी निघून गेला होता. रुग्णालय परिसरात येणाऱ्या रुग्णवाहिका आणि पादचाऱ्यांना यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कैलास क्षीरसागर यांनी याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सार्वजनिक रस्त्यावर, विशेषतः रुग्णालय आणि बाजारपेठेच्या भागात वाहने उभी करताना ती योग्य ठिकाणीच पार्क करावीत. बेशिस्त पार्किंगमुळे अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा चालकांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.