एअरटेल टॉवरमधील महागडी नेटवर्क कार्ड्स लंपास
दापोली:
दापोली तालुक्यातील अपना नगर परिसरातील एका मोबाईल टॉवरमधून एअरटेल कंपनीची महत्त्वाची तांत्रिक उपकरणे अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. सुमारे ४५ हजार रुपये किमतीची ही उपकरणे चोरीला गेल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपना नगर येथील इंडस टॉवरमध्ये एअरटेल ४ जी आणि ५जी नेटवर्कसाठी आवश्यक असलेले बीटीएस बॉक्स बसवण्यात आले आहेत. १ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने या बॉक्समधील महत्त्वाची कार्ड मशीन्स चोरून नेली. दोन्ही उपकरणांची अंदाजे किंमत ४५,००० रुपये इतकी आहे. ही कार्ड्स गेल्यामुळे परिसरातील नेटवर्क सेवेवरही परिणाम झाला होता.
याप्रकरणी फिर्यादी तेजस संतोष हेगिस्टे (वय ३४, रा. हातखंबा, रत्नागिरी; व्यवसाय- बी. फोर. एस. सोल्युशन प्रा. लि.) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेच्या बऱ्याच काळानंतर म्हणजे २४ फेब्रुवारी २०२६ रोजी हा २०२३ चे कलम ३०३(२) नुसार गुन्हा अधिकृतपणे नोंदवण्यात आला आहे.मोबाईल टॉवरमधील अशा प्रकारच्या तांत्रिक उपकरणांची चोरी करणारी एखादी टोळी सक्रिय आहे का, याचा तपास आता दापोली पोलीस करत आहेत.