लांजा एसटी स्टँडसमोर वाहतुकीला अडथळा
कार चालकावर गुन्हा दाखल
लांजा: मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा बाजारपेठ भागात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याप्रकरणी एका कार चालकावर लांजा पोलिसांनी कारवाई केली आहे. एसटी स्टँडच्या बाहेर ‘महाराष्ट्र नाथजल’ दुकानासमोर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेली माहिती अशी की, मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी अबीद अल्ली अजीज काझी (वय ५३, रा. देवधे, ता. लांजा) याने आपली पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी डिझायर कार (क्र. MH 08 AN 1816) लांजा बाजारपेठेत मुंबई-गोवा हायवेवर उभी केली होती.
सदर वाहन एसटी स्टँडच्या बाहेर अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी उभे असल्याने, तेथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना आणि इतर वाहनांना मोठा धोका निर्माण झाला होता. तसेच, यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार पुष्पा आंबादास मौळे (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी अबीद काझी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणाने वाहन उभे करून इतरांच्या जीवितास किंवा सुरक्षिततेस धोका निर्माण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.