रत्नागिरीतील पार्सेस स्क्वेअर परिसराचा पाणी आणि सांडपाण्याचा प्रश्न नगरसेवक सौरभ मलुष्टे यांच्याकडून मार्गी
रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा आणि सांडपाण्याचा गंभीर प्रश्न नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी यशस्वीपणे सोडवला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या सहकार्याने मलुष्टे यांनी प्रभागातील विकासकामांचा धडाका लावला असून, या कामगिरीमुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पार्सेस स्क्वेअर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होता, तर सुहास प्लाझा इमारतीमध्ये शेजारील इमारतीचे सांडपाणी साचत असल्याने रहिवासी त्रस्त होते. या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही तोडगा निघत नव्हता. मात्र, सौरभ मलुष्टे यांनी या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन तांत्रिक अडचणी दूर केल्या आणि हा प्रश्न कायमचा निकाली काढला. नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना स्थानिक नागरिक सुचिता देसाई यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सौरभ मलुष्टे हे नगरसेवक होण्यापूर्वीपासूनच समाजकार्यात सक्रिय आहेत. पार्सेस स्क्वेअरमधील पाणी टंचाई आणि सांडपाण्याची बिकट समस्या त्यांनी धडाडीने सोडवली आहे. कोणत्याही वेळी फोन केल्यास मदतीला धावून जाणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.”
या यशाबद्दल बोलताना सौरभ मलुष्टे यांनी सांगितले की, पालकमंत्री उदय सामंत आणि नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले. तसेच पाणी सभापती निमेश नायर, स्वच्छता सभापती बाबा नागवेकर आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे प्रलंबित प्रश्न सुटले आहेत. ज्या भागात अद्याप पाणी कमी दाबाने येत आहे, त्या समस्याही लवकरच सोडवणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.