लांजा येथे ‘ग्रामपंचायत अधिकारी प्रीमिअर लीग’ उत्साहात
पुरुष गटात रत्नागिरी तर महिला गटात मंडणगड अव्वल
लांजा:
रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘ग्रामपंचायत अधिकारी प्रीमिअर लीग २०२६’ क्रिकेट स्पर्धेत पुरुष गटात रत्नागिरी तालुक्याने तर महिला गटात मंडणगड तालुक्याने अजिंक्यपद पटकावले. लांजा तालुक्यातील केळंबे-विवली येथील खानविलकर मैदानावर २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी या स्पर्धा पार पडल्या.
आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या लेझीम पथकाने मान्यवरांचे उत्साही स्वागत केले. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष आर.डी. पाटील, संतोष हुमणे, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, चेतन शेळके, हिंदुराव गिरी, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र महाडीक, जिल्हा सरचिटणीस संजय दळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत जिल्ह्यातील ९ तालुक्यांचे पुरुष व महिला संघ सहभागी झाले होते. पुरुष गटात अंतिम सामना रत्नागिरी विरुद्ध संगमेश्वर यांच्यात झाला. अटीतटीच्या या लढतीत रत्नागिरी संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. संगमेश्वर संघ उपविजेता ठरला, तर राजापूर संघाने तृतीय आणि मंडणगड संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. राजापूरच्या संघास ‘शिस्तबद्ध संघ’ म्हणून गौरवण्यात आले. महिलांच्या अंतिम लढतीत मंडणगड संघाने लांजा संघाचा पराभव करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. यजमान लांजा संघ उपविजेता ठरला.
पुरुष विभागात मालिकावीर: असित कांबळे (राजापूर), उत्कृष्ट फलंदाज: विशाल सूर्यगंध (संगमेश्वर), उत्कृष्ट गोलंदाज: प्रवीण माईन (संगमेश्वर), सामनावीर: आशिष खोचाडे (रत्नागिरी) तर उत्कृष्ट यष्टीरक्षक: संजय दळवी (रत्नागिरी) यांना गौरवण्यात आले.
महिला विभागात मालिकावीर: दिपाली दरीपकर (मंडणगड), उत्कृष्ट फलंदाज: दिपाली गुळ्येकर (मंडणगड), उत्कृष्ट गोलंदाज: माधुरी पवार (रत्नागिरी), सामनावीर: कावेरी सुर्वे (मंडणगड) यांची निवड करण्यात आली.
यजमान लांजा तालुक्याने स्पर्धेचे उत्तम नियोजन केले होते. युट्युबवर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते, ज्याला जगभरातून प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनीही मैदानाला भेट देऊन खेळाडूंचे कौतुक केले. उत्कृष्ट समालोचन आणि खानविलकर मैदानाची सजावट यामुळे ही स्पर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या स्मरणात राहणारी ठरली. बक्षीस वितरण समारंभाने या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाची सांगता झाली.