पालपेणे येथील प्रौढाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
गुहागर: : तालुक्यातील पालपेणे (तळ्याचीवाडी) येथे राहणाऱ्या एका ४९ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनील शिवराम पोवार असे मृत व्यक्तीचे नाव असून, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे गिजवणे (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असलेले सुनील शिवराम पोवार (वय ४९) हे सध्या पालपेणे, तळ्याचीवाडी येथे वास्तव्यास होते. शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या.
कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी शृंगारतळी येथील पवार हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना चिखली आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी शनिवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री त्यांना ‘मृत’ घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दि. २१ फेब्रुवारी रोजी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू म्हणून या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. सुनील पोवार यांच्या निधनाने पालपेणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.