गुहागर बायपासवर दुचाकीला कारची धडक दोघे जखमी, कारचालकावर गुन्हा
चिपळूण
शहरातील गुहागर बायपास मार्गावर दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले असून, या प्रकरणी संबंधित कारचालकावर चिपळूण पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद पायस राजेंद्र कडवईकर (३४, रा. कापसाळ) यांनी दिली आहे. या अपघातात पायस कडवईकर यांच्यासह त्यांचे वडील राजेंद्र कडवईकर हे दोघे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायस कडवईकर आणि त्यांचे वडील दुचाकीने चिपळूणहून महाडकडे जात होते. चिपळूण बायपास मार्गावरील महालक्ष्मीनगर परिसरात आल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत दोघेही रस्त्यावर पडून जखमी झाले.या अपघात प्रकरणी संबंधित कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहन चालकाचे नाव व पत्ता तपासाअंती निष्पन्न होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.